

चंद्रपूर : इरई धरणाची जलपातळी सतत वाढत असल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व ७ दरवाजे ०.५० मीटरने उघडले असून, इरई नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून जलसाठ्याची मर्यादा ओलांडू नये यासाठी प्रशासनाने सर्व दरवाजे उघडून नियंत्रित जलविसर्ग सुरू केला आहे.
इरई नदीच्या काठावरील गावांमध्ये महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सूचना पोहोचविण्यात आल्या आहेत. नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, पाणी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या इरई धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. त्यामुळे जलसाठ्याची मर्यादा लक्षात घेऊन दरवाजे उघडून हजारो क्यूसेक पाणी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तालुका प्रशासन, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संपर्क साधला आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सतर्कता पथक तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत कार्य राबविण्यास आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी सूचना
नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, घराजवळ पाणी शिरल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, धरणाची पातळी सातत्याने निरीक्षणात ठेवली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा
पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.