Chanrapur News | न्यायाच्या मागणीसाठी आसाळा येथील शेतकऱ्याची बैलबंडीसह तहसील कार्यालयावर धडक!

शेतातील रस्त्याच्या वादातून अनोखे आंदोलन; प्रशासनाकडे तातडीने तोडगा काढण्याची मागणी
बैलबंडीसह तहसील कार्यालयात पोहचलेला शेतकरी
बैलबंडीसह तहसील कार्यालयात पोहचलेला शेतकरी
Published on
Updated on

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आसाळा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर न्याय मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. कोणताही मोठा मोर्चा किंवा जमाव न आणता संबंधित शेतकरी एकटाच बैलबंडीसह वरोरा तहसील कार्यालयात पोहोचला. आपल्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची तालुकाभर चर्चा रंगली.

मिळालेल्या माहितीनुसार, आसाळा येथील संबंधित शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याबाबत अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महसूल प्रशासनासह संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने अखेर शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी संबंधित शेतकरी आपल्या बैलबंडीसह थेट वरोरा तहसील कार्यालयात दाखल झाला. बैलबंडी कार्यालयाच्या आवारात उभी करून त्याने प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. शेतात जाण्यासाठी योग्य आणि कायदेशीर रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अशी त्याची प्रमुख मागणी होती.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्याने प्रशासनाकडे निवेदन सादर करून संबंधित रस्ता चुकीच्या पद्धतीने मंजूर झाल्याचा आरोप केला. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, तहसील प्रशासनाने शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारले असून संबंधित प्रकरणाची कायदेशीर व वस्तुनिष्ठ चौकशी करून नियमानुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्याने आपले आंदोलन शांततेत स्थगित केले. एकट्या शेतकऱ्याने बैलबंडीसह तहसील कार्यालय गाठून न्यायासाठी केलेल्या या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, आता या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news