

Nagbhid Talodhi Road Accident
चंद्रपूर : नागभीड–तळोधी (बा.) मार्गावर चिंधिमाल फाट्याजवळील पुलानजीक शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सात जणांपैकी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारने तीन ते चार पलट्या घेतल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 34 एडब्ल्यू 2910 क्रमांकाच्या कारमधून सात जण तळोधी बाळापूर येथून नागभीडकडे जात होते. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास चिंधिमाल फाट्याजवळील पुलानजीक भरधाव कार अचानक रस्त्याच्या खाली उतरली. त्यानंतर चालकाने कार पुन्हा डांबरी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरच उलटली आणि तिने तीन ते चार पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात सुमारे ५० वर्षे वयोगटातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कारमधील चार जणांनाही मार लागला आहे.
अपघाताची माहिती मिळताच चिंधिमाल येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सर्व जखमींना तातडीने नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृत व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता कारचालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असावा, असा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. चालकाने कार रस्त्याच्या खाली नेल्यानंतर पुन्हा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला असता वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र, चालक मद्यधुंद होता की नाही, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
विशेष म्हणजे, अपघातग्रस्त कार लातूर जिल्ह्यातील असल्याचे समजते. मात्र, मृतक आणि जखमी व्यक्ती नेमक्या कोणत्या गावातील आहेत, याची माहिती वृत्त लिहिपर्यंत मिळू शकली नव्हती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.