

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी येथील तरुण बादल ज्ञानेश्वर मेश्राम (वय २२) याच्या बेपत्ता प्रकरणातून उघडकीस आलेला निर्घृण खून आणि त्यानंतर तपासादरम्यान मुख्य आरोपीने केलेली आत्महत्या, या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. अंधश्रद्धेचा गैरफायदा, पैशाचे आमिष आणि विश्वासघात यांचे भयावह चित्र या प्रकरणातून समोर आले असून, गुन्हा उघडकीस आणण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे.
17 जानेवारीला घरातून निघून गेला…
. १७ जानेवारी २०२६ रोजी भिसी येथी गीता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे तक्रार दिली होती की, त्यांचा मुलगा बादल मेश्राम हा उमरेड येथे सर्व्हिसिंगला टाकलेली दुचाकी घेऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला; मात्र तो परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. या तक्रारीवरून दि. १९ जानेवारी २०२६ रोजी मिसिंग क्र. ०३/२०२६ नोंदविण्यात आली. मात्र त्याच दिवशी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान मुख्य आरोपी देवानंद गोवर्धन श्रीरामे रा. मिनझरी व त्याचे दोन साथीदार – आरीफ उस्मानखॉ पठाण आणि सौरभ सुभाष चौधरी यांनी संगनमत करून खडसंगी–मुरपार जंगल परिसरात, देवानंदच्या शेतालगत असलेल्या नाल्याजवळ बादलचा गळा आवळून निर्घृण खून केला.
अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून नेले
आरोपी देवानंद याने मृतकाला “आश्रमात महाराजांकडून फुंकर मारलेली पुडी मिळेल, ती आवडत्या मुलीवर टाकलीस तर ती तुझी होईल” असे आमिष दाखवून जंगलात बोलावले. अंधश्रद्धेचा फायदा घेत योग्य संधी साधून तिघांनी मिळून बादलची हत्या केली.
19 जानेवारीला आईची मिसिंग तक्रार
बादल घरी परत न आल्याने चिंतेत असलेल्या त्याच्या आई सौ. गीता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी 19 जानेवारी 2026 रोजी पोलीस स्टेशन भिसी येथे मिसिंग रिपोर्ट दाखल केला. त्यावरून मिसिंग क्र. 03/2026 नोंदवण्यात आला आणि तपास सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, मृतक बादल याला देवानंद श्रीरामे याने वारंवार 9 वेळा फोन कॉल केले होते. या संशयास्पद बाबीमुळे 20 जानेवारी रोजी देवानंदला भिसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले.
23 जानेवारीला मुख्य आरोपीची आत्महत्या
पोलीस तपास पुढे सरकत असतानाच 23 जानेवारी 2026 रोजी मुख्य आरोपी देवानंद श्रीरामे याने ठाणेदारांच्या नावाने चिठ्ठी लिहून दारूमध्ये विष मिसळून आत्महत्या केली. या घटनेमुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे तपासात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
जंगलातून मृतदेह हस्तगत
उर्वरित आरोपींच्या चौकशीदरम्यान आणि देवानंदने दाखविलेल्या ठिकाणी तहसीलदार, चिमूर यांच्या उपस्थितीत जंगलातील नाल्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. उमरेड येथील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, गोपनीय माहिती आणि सायबर तपासाच्या आधारे हा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आला. आरोपींनी दुचाकी उमरेड येथे टाकून मोबाईल फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात पोलीस निरीक्षक (स्थागुशा) अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे (ठाणेदार, भिसी), सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि रविंद्र वाघ, भारत थिटे, सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन कुरेवार, नितीन सावे, प्रसाद धुलगुंडे, पोअं हिरालाल गुप्ता, सतिश झिलपे, मंगेश चौधरी तसेच पोलीस स्टेशन चिमूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या अधिकारी–अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणामुळे अंधश्रद्धा, लालसा आणि मानवी जीवनाचे मोल यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका निष्पाप तरुणाचा बळी आणि त्यानंतर मुख्य आरोपीची आत्महत्या – या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.