

चंद्रपूर : पडोली पोलिस ठाणे हद्दीतील साखरवाही गावात 2019 मध्ये घडलेल्या खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज सोमवारी लागला असून, जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूरने आरोपी वैभव पुंडलिक शेरकी (35) याला भादंवि कलम 302 अंतर्गत आजन्म सश्रम कारावास (जन्मठेप) व 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी पडोली पोलिस ठाण्याच्या मौजा साखरवाही येथे फिर्यादी आशुतोष दिलीप शेरकी (21) यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या वैभव पुंडलिक शेरकी याने मृतक दिलीप बाबुराव शेरकी (51) यांच्याशी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद घातला. हा वाद पुढे हाणामारीत बदलला आणि आरोपीने बांबूच्या काठीने दिलीप शेरकी यांच्या डोक्यावर, हातावर व छातीवर जबर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत दिलीप शेरकी यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर पडोली पोलिस ठाण्यात अप.क्र. 9/2019, कलम 302 व 324 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नागेश जायले यांनी केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. भिष्म मॅडम यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता प्रशांत घट्टुवार (जिल्हा सरकारी वकील, चंद्रपूर) यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तर पैरवी अधिकारी मपोअं रोशनी रंगारी यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच तपास व न्यायालयीन समन्वयासाठी दत्तक अधिकारी सपोनि श्री. योगेश हिवसे यांनी कामगिरी केली. प्रकरणातील न्यायालयीन पैरवी व तपासातील महत्त्वपूर्ण सहकार्य पोलिस निरीक्षक श्री. योगेश हिवसे आणि पैरवी अधिकारी रोशनी रंगारी यांनी केले.