

Chandrapur Voting Percentage
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.१५) सकाळी ८ पासून मतदान सुरू असून, सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २६.२६ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागांमध्ये सुरू असलेल्या मतदानात दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण ७८ हजार ७७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरातील एकूण मतदारसंख्या २ लाख ९९ हजार ९९४ असून, त्यामध्ये ४२ हजार ७५० पुरुष, ३६ हजार २३ महिला आणि २ इतर मतदारांनी मतदान केले आहे.
प्रभागनिहाय आकडेवारीनुसार काही प्रभागांत मतदानाचा टक्का तुलनेने अधिक असून, प्रभाग क्रमांक १४ (भिवापूर) येथे सर्वाधिक ३१.०२ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक १७ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग) येथे २८.८३ टक्के, तर प्रभाग क्रमांक ४ (बंगाली कॅम्प) येथे २८.४१ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ७ (जटपुरा) येथे सर्वात कमी २३.४७ टक्के, तर प्रभाग क्रमांक ५ (विवेक नगर) येथे २३.८१ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. उर्वरित बहुतांश प्रभागांमध्ये मतदानाचा टक्का २५ ते २७ टक्क्यांच्या दरम्यान आहे.
निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता असून, सायंकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.
एकूणच, दुपारी १.३० वाजेपर्यंत मध्यम प्रतिसाद असला तरी उर्वरित वेळेत मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.