

Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका महापौरपदाचा तिढा अद्याप कायम असून, काँग्रेसमधील नेत्यांना त्यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिल्ली दरबारी पोहोचला असून, पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तोडगा निघेल, असा विश्वास पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यानंतर या महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर करावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्व विजय वडेट्टीवार यांनी शिवसेन 'उबाठा' पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.
त्यानंतर चंद्रपूर महानगरपालिका महापौरपदाचा प्रश्न निकाली येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वादामुळे हा प्रश्न चिघळला आहे. आता हा प्रश्न दिल्ली दरबारी आला असून चंद्रपूर महापालिकेचे नगरसेवक दिल्ली दरबारी पोहोचले आहे.