

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही काँग्रेस पक्षाला अद्याप महापौर पदाचा उमेदवार निश्चित करता आलेला नाही. सत्तेच्या उंबरठ्यावर असताना पक्षातील आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने काँग्रेससमोर सत्ता स्थापन करताना मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने 27 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेसाठी मजबूत स्थिती निर्माण केली होती. मात्र महापौर पदाच्या उमेदवारीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद चिघळले असून, अद्याप उमेदवार निश्चित न झाल्याने राजकीय संभ्रम कायम आहे.
शुक्रवारी (दि.24 जानेवारी) सकाळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमधील सर्व वाद मिटल्याचा दावा करत लवकरच महापौर पदाचा उमेदवार जाहीर होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र दिवसभर चर्चांच्या फेऱ्या सुरू राहूनही सायंकाळपर्यंत उमेदवार ठरू शकला नाही. अखेर सायंकाळी काँग्रेसमधील मतभेद उघड झाले. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपापल्या समर्थक नगरसेवकांसह स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेते आपल्या-आपल्या गटातील नगरसेवकांसह नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. तेथे स्वतंत्र गट स्थापनेची प्रक्रिया पार पडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटात 13 नगरसेवक, तर आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात 14 नगरसेवक सहभागी झाले आहेत. दोन्ही गटांकडून “आम्हीच खरी काँग्रेस” असल्याचा दावा केला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सत्तेच्या अगदी जवळ पोहोचूनही काँग्रेसला अंतर्गत वादांमुळे सत्ता स्थापनेत अडथळे येत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात आयुक्त कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसमधील आमदार आणि खासदार यांच्यातील सत्तासंघर्ष चांगलाच पेटला असून, या सगळ्या घडामोडींकडे भाजप लक्ष ठेवून असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.