

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला असून, काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. स्थायी समितीच्या सदस्यांची नावे देताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करता मनमानी केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी ही नोटीस जारी केली आहे. स्थायी समितीच्या सदस्य निवडीच्या प्रक्रियेत पक्षशिस्तीचे पालन झाले नसल्याचा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत वरिष्ठ नेत्यांशी समन्वय साधणे अपेक्षित असताना तो न साधता निर्णय घेतल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.
नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, स्थायी समितीसाठी सदस्यांची नावे निश्चित करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार तसेच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. मात्र गटनेते राजेश अडूर यांनी कोणतीही चर्चा न करता स्वतःच्या मर्जीने नावे सुचविल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने या प्रकाराला पक्षशिस्तीचा भंग मानत याकडे गंभीरतेने पाहिले आहे. त्यामुळे अडूर यांना तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्धारित वेळेत समाधानकारक खुलासा न दिल्यास पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या आरोपाखाली कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या घडामोडीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.