Mansoon Update Chandrapur : मान्सूनची प्रतीक्षा कायम; धरणांतील जलसाठा चिंतेच्या टप्प्यावर

चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ३४.५२ टक्के उपयुक्त साठा; चंदई प्रकल्प पूर्ण कोरडा, खरीप हंगामावर संकटाचे सावट
Mansoon Update Chandrapur : मान्सूनची प्रतीक्षा कायम; धरणांतील जलसाठा चिंतेच्या टप्प्यावर
Published on
Updated on

चंद्रपूर : जून महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचला असतानाही मान्सूनने अपेक्षित जोर धरलेला नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प मिळून केवळ ३४.५२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती प्रशासन आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. काही प्रकल्पांतील जलपातळी अत्यंत कमी झाली असून चंदई प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चंद्रपूर पाटबंधारे विभागाने २१ जून रोजी सकाळी ८ वाजता प्रसिद्ध केलेल्या जलाशय पातळी अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ११६.७३३ दलघमी इतका आहे. मागील वर्षी याच दिवशी जलसाठा ९७.७९९ दलघमी होता. मात्र यंदा खरीप हंगामाच्या दृष्टीने हा साठा अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यातील प्रमुख आणि महत्त्वाच्या इरई धरणात सध्या ३५.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपयुक्त क्षमतेच्या तुलनेत हे धरण अजूनही निम्म्याहून कमी भरलेले आहे. दुसरीकडे असोलामेंढा धरणात ५२.१३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६५ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.

मध्यम प्रकल्पांच्या स्थितीतही फारसा दिलासा मिळालेला दिसत नाही. पकडीगुड्डाम प्रकल्पात ४७.६६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात ४२.४१ टक्के आणि अमलनाला प्रकल्पात ३६.९४ टक्के साठा उपलब्ध आहे. मात्र घोडाझरी धरणात केवळ १६.५८ टक्के तर लभानसराड प्रकल्पात १२.१२ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक गंभीर स्थिती चंदई प्रकल्पाची असून येथे एक थेंबही उपयुक्त साठा उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे.

विशेष म्हणजे, १ जूनपासून प्रकल्प क्षेत्रात एकूण ४२५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी त्याचा अपेक्षित परिणाम धरणांतील जलसाठ्यावर दिसून आलेला नाही. मोठ्या प्रकल्प क्षेत्रात १३० मिमी तर मध्यम प्रकल्प क्षेत्रात २९५ मिमी पाऊस झाला आहे. मात्र या पावसामुळे जलाशयांमध्ये अपेक्षित पाण्याची आवक झालेली नसल्याचे दिसत आहे.

सध्या जिल्ह्यातील कोणत्याही धरणातून सांडव्यावरून पाणी सोडण्याची वेळ आलेली नाही. उलट डोंगरगाव प्रकल्पातून सिंचनासाठी ०.११ दलघमी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे जलसाठ्यावर वाढणारा ताण स्पष्टपणे जाणवत आहे.

दरम्यान, खरीप पेरण्यांना वेग येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास धरणांतील जलसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. मात्र मान्सूनचा वेग मंदच राहिल्यास जिल्ह्याला पुन्हा एकदा गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news