Chandrapur Crime: अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार; आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

पोक्सो कायद्यान्वये चंद्रपूर जिल्हा न्यायालयाचा निकाल; पाच हजार रुपयांचा दंड
assault case
assault casefile photo
Published on
Updated on

चंद्रपूर : अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने हा निकाल ५ सप्टेंबर २०२६ रोजी दिला.

३ जून २०२२ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची पत्नी कामावरून घरी परतले. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना आरोपीच्या घराजवळून बालिकेचा आवाज ऐकू आला. त्यानंतर फिर्यादी आरोपीच्या घरात गेले असता आरोपी बालिकेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी फिर्याद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा क्रमांक ६११/२०२२ दाखल केला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६(एबी), ५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजुरकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एस. आर. डेगावार यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी-पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजुरकर, सरकारी अभियोक्ता एस. आर. डेगावार, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शामराव पोईनकरे यांनी काम पाहिले. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूरच्या समन्वयातून ही कारवाई पूर्ण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news