

चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी पैनगंगा नदीपात्रातील पोकलेनद्वारे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा पुढारीने लावून धरल्यानंतर खाणीकर्म विभागाच्या पथकांनी कोरपना तालुक्यात दौरा केला. मात्र, सर्वाधिक चर्चा असलेल्या कोळशी आणि कारवाई येथील वाळू घाटांवर जाणेच टाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बिना टीपीने (ट्रान्झिट पास) सर्रास धावणारी मोठी रेतीवाहू वाहने दुर्लक्षित करून केवळ दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील एका रेतीव्यवसायिकाकडून ‘टोकन’ पद्धतीने अवैध रेती उत्खननाला खुलेआम पाठबळ दिले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. टोकनच्या माध्यमातून वाहनांना मोकळीक दिली जात असून नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणाचे अधिकृत मोजमाप व मूल्यांकन करण्यात आले आहे, त्या जागेऐवजी नदीपात्रातील इतर भागातच खोदकाम सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. पोकलेन मशीनच्या सहाय्याने नदीच्या मध्यभागातून खोल उत्खनन केले जात असल्याने पैनगंगा नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात आला आहे.
मंगळवारीदेखील खाणीकर्म विभागाचे पथक दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत परिसरात फिरत होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा दौरा केवळ दिखावा होता का, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.
दरम्यान, नदीपात्रातील अनियंत्रित उत्खननामुळे भविष्यात भूजल पातळी घटण्याचा आणि परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. आधीच उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गावांमध्ये यामुळे तीव्र चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, रेतीवाहू जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांना धूळ, खड्डे आणि अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.