Chandrapur Mayor Election : चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचाच महापौर; ठाकरे सेनेसोबत चर्चा अंतिम टप्प्यात : खा. प्रतिभा धानोरकर

‘सुरुवातीचा महापौर काँग्रेसचाच राहणार’
chandrapur municipal corporation
chandrapur municipal corporationFile Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता अंतिम स्वरूप येत असल्याचे संकेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहेत. ठाकरे सेनेसह महापौरपदाबाबत चर्चा सुरू असून, काँग्रेस पक्ष सुरुवातीचा महापौर सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार काँग्रेसचा ठरलेला फॉर्म्युला बदलणार नसल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे सेनेसह चर्चा सुरू, पुन्हा बैठक

खा. प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, ठाकरे सेनेसह महापौर पदाबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात पक्ष निरीक्षक सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत ठाकरे सेनेकडून महापौर पदाची मागणी करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीचा महापौर काँग्रेसचाच राहील, हे स्पष्टपणे मांडण्यात आले. या विषयावर आज पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फॉर्म्युला निश्चित

पक्षश्रेष्ठींनी सुचविलेल्या फॉर्म्युल्यानुसार, सुरुवातीचे अडीच वर्ष महापौर पद काँग्रेसकडे राहील. उपमहापौर पद तसेच गटनेतेपद हे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडे दिले जाईल. याशिवाय, जे पक्ष काँग्रेसला सहकार्य करतील, त्यांना स्थायी समितीचे (स्टँडिंग कमिटी) सदस्यत्व देण्यात येईल, असा स्पष्ट फॉर्म्युला ठरल्याचे खा. धानोरकर यांनी सांगितले.

संख्याबळ आमच्याकडे, त्यामुळे महापौर काँग्रेसचाच

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने महापौर पद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचा पुनरुच्चार खा. धानोरकर यांनी केला. “काँग्रेसकडे ३२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्ष तसेच ठाकरे सेनेला एकत्र करून गट स्थापन करण्यात येणार आहे. जे पक्ष सहकार्य करतील, त्यांना उपमहापौर पद व स्टँडिंग कमिटीचे सदस्य देण्याचे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. यात आता कोणताही बदल होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

काँग्रेसचा महापौर निश्चित

“उद्या, मंगळवारी (दि. ९) चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचाच महापौर विराजमान होणार आहे,” असा ठाम दावा करत खा. प्रतिभा धानोरकर यांनी सर्व राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. महापालिकेत स्थिर आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचेही धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news