

चंद्रपूर : वरोरा शहराजवळील गाव सलोरी येथे किराणा जनरल स्टोअर्सला अचानक भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील मोठ्या प्रमाणातील किराणा माल जळून खाक झाला.
सलोरी येथील रहिवासी नामदेव बापूराव तुमसरे यांच्या घराला लागूनच किराणा जनरल स्टोअर्स आहे. अचानक दुकानातून धूर निघू लागल्यानंतर काही वेळातच आगीने संपूर्ण दुकानाला वेढा घातला. आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानाला लागूनच घर असल्याने आग घरापर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांनी तातडीने सतर्क होत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपालिकेचे अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्थानिक तरुण रवि बरसे, निलेश तवाडे, मनोज व बादल गज्जलवार यांनीही प्रसंगावधान राखत मदत केली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आजूबाजूच्या घरांपर्यंत पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या आगीत दुकानातील किराणा मालाचे मोठे नुकसान झाले असून, नेमका किती आर्थिक फटका बसला याचा अंदाज घेतला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य कारणामुळे, याबाबत प्रशासनाकडून तपास केला जात आहे.