

चंद्रपूर : वशीकरणाचे टोटके आणि वनौषधींच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून ५३ हजार रुपये घेतल्याचा आरोप असलेल्या सतीश गिळसावळेबाबा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वशीकरणाचे टोटके करून देण्यासह वनौषधींच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचे आश्वासन देत संबंधित व्यक्तीकडून ५० हजार रुपये रोख आणि तीन हजार रुपये फोनपेद्वारे स्वीकारल्याचा आरोप आहे. या कथित प्रकारासंदर्भात भद्रावती येथील सूरज शहा यांनी तयार केलेले व्हिडिओ पोलिसांकडे सादर केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले.
पोलिसांनी केलेल्या छापेमारीदरम्यान ५० हजार रुपये रोख, गोमुख, कस्तुरी पावडर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील शिक्षेची तरतूद सात वर्षांपेक्षा कमी असल्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला सोडण्यात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.