चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील चिंधीचक गावात मध्यरात्री बिबट्याने थेट मध्यवस्तीत शिरून तिन शेळ्यांचा फडशा पाडला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा थरार स्पष्टपणे कैद झाला आहे. अचानक गावाच्या हृदयस्थानीच वन्यप्राण्याने शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात माणसांवर हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
चिंधीचक गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर राहणारे शेतकरी राजेंद्र राखडे यांच्या घरी बिबट्याने शनिवारी मध्यरात्री थेट एन्ट्री केली. काही क्षणांत तिन शेळ्यांचा फडशा पाडून त्यापैकी एका शेळीला तोंडात ओढत गावाबाहेर निघून गेला. सकाळी कुटुंबीय जागे झाले तेव्हा दोन शेळ्या घटनास्थळी मृतावस्थेत आढळल्या तर एका शेळीचा मागमूस नव्हता. ग्रामपंचायतीसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दृश्याने गावकऱ्यांचे काळीज दडपून गेले. गावाच्या शेवटच्या टोकांवरील घरांतील पाळीवर जनावरांवनर बिबट्याने पूर्वी अनेकदा हल्ले केले आहेत. मात्र गावाच्या मध्यवस्तीत थेट घुसून शिकार करण्याचा प्रकार हा पहिलाच आहे. त्यामुळे ग्रामस्थ आता दहशतीखाली आले आहेत.
काही तासांपूर्वीच सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात बिबट्याने घराच्या उंबरठ्यावरून आठ वर्षांच्या चिमुकल्याला रात्री साडेसातच्या सुमारास उचलून नेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर नागभीड तालुक्यातील चिंधीचक गावातही रात्रभर रस्त्यावर बिबट्याचा संचार आढळून आला आहे. आता चिंधीचक गावाच्या मध्यवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
नुकसान व भीतीचे वातावरण
बिबट्याने शेतकरी राजेंद्र राखडे यांच्या तिन शेळ्यांची शिकार केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर गावातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शेळ्या, उद्या माणसांवर हल्ला होणार नाही ना ?" अशी चिंता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, गावात भटकणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.