

Korpana Adilabad Highway Accident
चंद्रपूर : पहाटेच्या दाट धुक्यात कामावर जाणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.२२) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव-चनई खुर्द फाट्यादरम्यान घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात प्रमोद भाऊराव किन्नाके (वय २६), रा. तुळशी, ता. कोरपना) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रणय मुके (वय २८), रा. निंबाळा, ता. वणी, जि. यवतमाळ) याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वैभव रमेश राऊत (वय २५) रा. तांबाडी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही आरसीसीपीएल लाईमस्टोन माईन्स, परसोडा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. पहाटेच्या सुमारास तिघेही एमएच ३४ बीटी २१२० क्रमांकाच्या प्लेटिना १२० दुचाकीने कोरपना येथून कामावर जात होते. दरम्यान, परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अशातच विरुद्ध दिशेने रॉंग साईडने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांना जीव गमवावा लागला.
घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमींना कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद रहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार व कोरपना पोलीस करीत आहेत.