

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील जुनोना चौकात ३० जुलै रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या एकूण तीन आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली आहे.
३० जुलै रोजी बाबुपेठ येथील जुनोना चौक परिसरात बुधासिंग टाक याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत बुधासिंग टाकचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुधासिंगचा नातेवाईक राकेश गौतम तेलंग यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलीसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१), ३ (५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्ह्यानंतर मुख्य आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांनी शोध मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी भाऊ सोनुसिंग जितसिंग टाक (रा. जुनोना चौक, बाबुपेठ), लाला उर्फ नैनेश सहा (रा. फुले चौक, बाबुपेठ) , सहआरोपी व पवन पाटील (रा. फुले चौक, बाबुपेठ) – आरोपींना पळून जाण्यास मदत करणारा अशा तिघांना
अटक करण्यात आली असून, या गोळीबाराच्या घटनेशी त्यांचा थेट संबंध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) व पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख (पोलीस स्टेशन रामनगर) यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत सायबर पोलीस स्टेशन, स्थानीय गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.