

Chandrapur Sand Seizure
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत तब्बल ४० लाख रुपये किमतीचा १६ चाकी पल्ला ट्रक आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीची १२ ब्रास रेती असा एकूण ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनमालकाचा शोध सुरू आहे.
दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाला रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत महेंद्र कंपनीचा १६ चाकी पल्ला ट्रक क्रमांक MH 40 CT 4133 आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १२ ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी वाहन आणि रेती ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या १६ चाकी वाहनाची अंदाजे किंमत ४० लाख रुपये, तर रेतीची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कारवाईत एकूण ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी शरद पुंजराम शेंद्रे (वय ३९, रा. तादेगाव ठाकूर, ता. तिवसा, जि. अमरावती) याच्यासह सिद्धार्थ विनायकराव गडलिंग (वय ३३, रा. परतोडा, ता. आर्वी, जि. वर्धा) यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. तर वाहनमालक समरजीत दर्शनसिंग गरेवाल (रा. गुरुकुंज मोजरी, ता. तिवसा, जि. अमरावती) हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच जमीन महसूल कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या माध्यमातून शासनाच्या महसुलाला फटका बसत असल्याने अशा प्रकारांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग राजुरा पथकाने केली. अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात मिळणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.