चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी १० हजाराची लाच घेताना एका ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने बुधवारी (दि.२६) रंगेहाथ अटक केली. चंद्रशेखर केशव रामटेके असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तो सावली तालुक्यातील लोणडोली येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गावातीलच आहेत. त्यांना वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेर्गत घरकुल मंजूर झाले होते. मंजूर झालेल्या एकूण १ लाख २० हजारांपैकी १५ हजारांचा पहिला हप्ता त्यांना २२ फेब्रुवारीला मिळाला होता. त्यानंतर दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला होता. परंतु ग्रामसेवक चंद्रशेखर केशव रामटेक याने ७० हजारांचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांना २० हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने रामटेके याच्याविरुद्धात चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार मंगळवारी (दि.२५) लाचलुचपतने तक्रारीची पडताळणी केली. यादरम्यान रामटेके याने तक्रारदार यांना २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपतने सापळा रचून १० हजाराची लाच घेताना रामटेके याला मंगळवारी रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, संदिप कौरासे यांनी केली.