

चंद्रपूर : गोसेखुर्द कालवा सध्या वन्य प्राण्यांच्या जीवासाठी मृत्यूचा सापळा ठरतो आहे. कालव्यात वारंवार वन्यप्राणी पडून अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. कालव्यात पडलेल्या एका चितळाला तब्बल सहा तास रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. मोहिमेनंतर त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
आलेवाही बीटातील खरकाळा गावाजवळ शनिवारी (दि.६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंदाजे सात ते आठ वर्षांचे नर चितळ कालव्यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर वन विभाग व स्वाब बचाव दलाच्या वतीने बचाव मोहीम राबविण्यात आली. तब्बल सहा तास रेस्क्यू करून रात्री अकरा वाजता चितळाला दोराच्या सहाय्याने पकडून कालव्याबाहेर काढण्यात यश मिळाले. ही कामगिरी स्वाब संस्थेचे बचाव दलाचे जीवेश सयाम, यश कायरकर, गणेश गुरणुले, आदित्य नान्हे यांनी चार किलोमीटर पाठलाग करत चितळाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर चितळाने जंगलाच्या दिशेने रात्रीच्या अंधारात धुम ठोकली. आलेवाही बीटचे वनरक्षक पंडित मेकेवाड, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, वन चौकीदार देवेंद्र उईके यांसह अनेक सदस्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
पवनी ते चंद्रपूरकडे जाणारा गोसीखुर्द कालवा तळोधी वनपरिक्षेत्रातील जंगलातून जात असल्याने नागभीड व तळोधी भागातील अनेक वन्यप्राणी या कालव्यात पडून अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी रानगवा, नीलगाय, रानटी डुकरे, चितळे आणि पाळीव जनावरे कालव्यात पडल्याची उदाहरणे आहेत. सध्या कालव्याचे पाणी कमी असल्याने जीवितहानी टळली असली तरी पाणी सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्ग नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहे. स्वाब संस्थेने प्रशासन आणि गोसीखुर्द बांधकाम विभागाकडे कालव्यावर पूल आणि चढण्यासाठी पायऱ्या बनवण्याची मागणी वारंवार केली असली तरी त्याकडे अद्याप दुर्लक्ष होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.