

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथील मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या अनधिकृत जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उप पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, चालक, संयोजक आणि जुगार खेळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज शनिवारी प्राप्त गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक आणि उप पोलीस स्टेशन लाठी येथील अधिकारी व अंमलदारांनी पोडसा येथील राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर शाखा पोडसा (रजि. नं. एफ-००१४८११) या सार्वजनिक ठिकाणी कार्यरत मनोरंजन क्लबवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान चालक महेश्वर गोपालनायक अजमेरा (वय ४२) रा. चिंताकुंडा, ता. शिरपूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा याने क्लबच्या संयोजकांसोबत संगनमत करून परवानगीच्या अटी व नियमांचे उल्लंघन करत जुगार खेळविल्याचे आढळले. पंचनामा प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी डीव्हीआर, ताश पत्ते, नाणे, रजिस्टर असा एकूण ३४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी क्लब चालक, संयोजक, जुगार खेळणारे सदस्य आणि अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये उप पोलीस स्टेशन लाठी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.