Chandrapur Tiger Monitoring | वाघाच्या हालचालींवर वनविभागाची करडी नजर; आठ ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्हीद्वारे देखरेख

गिरगाव परिसरात गस्त वाढवली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन, वाघाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष
Camera Traps Tiger Tracking
Camera Traps Tiger TrackingAI Photo
Published on
Updated on

Chandrapur Human Wildlife Conflict

चंद्रपूर : गिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी आत्माराम दसरू बोरकर (वय ५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने तातडीने पावले उचलत परिसरात कडक सतर्कता उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाघाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी आठ ट्रॅप कॅमेरे आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला असून जंगलालगतच्या भागात विशेष गस्त वाढविण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील गिरगाव परिसरात ही घटना घडली. शेतकरी आत्माराम दसरू बोरकर यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा वावर अद्यापही परिसरात असल्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

Camera Traps Tiger Tracking
Chandrapur Tiger Death | पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

वाघाच्या हालचालींचा अचूक मागोवा घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. या माध्यमातून वाघाच्या उपस्थितीची माहिती मिळवून त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तसेच जंगलालगतच्या संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक, क्षेत्र सहाय्यक आणि वनमजूरांची पथके परिसरात सतत गस्त घालत आहेत. जंगल परिसर तसेच शेतशिवारात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Camera Traps Tiger Tracking
Chandrapur Pollution | प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी

वनविभागाने गावकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी एकट्याने जंगलात किंवा जंगलालगतच्या भागात जाऊ नये, विशेषतः सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी अधिक सावध राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकरी, गुराखी आणि शेतमजुरांनी समूहाने शेतात जावे, सोबत टॉर्च आणि मोबाईल ठेवावा तसेच लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, वनविभागाकडून गावात जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे. वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाची करडी नजर आहे.

- ए. आर. कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news