

चंद्रपूर : जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमिततेवर कृषी विभागाने मोठी कारवाई करत 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले असून 3 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. अचानक तपासणी व विशेष सुनावणीनंतर ही कारवाई करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील खत विक्री व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांकडून खत विक्रीत होत असलेल्या अनियमिततेची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे. 24 एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीनंतर 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच 3 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 12 केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही कृषी केंद्रांवर खतांच्या साठ्यात तफावत, तसेच विक्री दरात नियमभंग होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध ठिकाणी अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक केंद्रांमध्ये साठा व नोंदीत विसंगती आढळून आली.
यानंतर संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले. परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सुनावणीत प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. मात्र, अनेक केंद्र चालकांचे खुलासे असमाधानकारक ठरल्याने 16 केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, खत विक्री किंवा इतर कृषी निविष्ठांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे जिल्ह्यातील साठेबाजी व खतांच्या चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
निलंबित कृषी केंद्रे
श्री ॲग्रो ट्रेडर्स (दुर्गापूर), शिव कृषी केंद्र (वरोरा), कल्पना कृषी केंद्र (वरोरा), आदर्श कृषी केंद्र (जिबगाव-सावली), धाईत कृषी केंद्र (निफंद्रा-सावली), साई कृषी केंद्र (सावली), आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था (गिरगाव-नागभीड), देशमुख कृषी केंद्र (मांगली-नागभीड), सेवा सहकारी संस्था (पळसगाव-नागभीड), प्रभु कृपा कृषी केंद्र (मेंढा-नागभीड), ठेंगरे कृषी केंद्र (पिंपळगाव-ब्रम्हपुरी), विनोद कृषी केंद्र (पिंपळगाव-ब्रम्हपुरी), पवन कृषी केंद्र (भद्रावती), समर्थ ॲग्रो एजन्सी (गवराळा-भद्रावती), पाथरी सेवा सहकारी संस्था (पाथरी-सावली), गणेश कृषी केंद्र (बेंबाळ-मुल).