

चंद्रपूर: जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात तब्बल १४ हजार किलो वजनाचा आणि २२ लाख ६८ हजार रुपये किमतीचा निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मूल येथील चमोरशी रोडवरील जेठमल भंवरलाल सारडा यांच्या मालकीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. विविध ब्रँडच्या रिफाइंड सोयाबीन तेलाचे रिपॅकिंग या ठिकाणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता, पुनर्वापर केलेल्या टिनमध्ये तेल साठवून ठेवलेले आढळले. प्राथमिक तपासानुसार, हे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आहे. कारवाईदरम्यान, तपासणीसाठी तेलाचे एकूण पाच नमुने घेण्यात आले असून, सुमारे १४ हजार किलो इतका साठा जप्त करण्यात आला आहे. हाय्यक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना स्वस्त दरात मिळणाऱ्या तेलाच्या किंवा खाद्यपदार्थांच्या खरेदीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तेलाच्या पॅकिंगवरील लेबल, उत्पादन तारीख, आणि FSSAI क्रमांक तपासावा. निकृष्ट दर्जाचे तेल आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.