

चंद्रपूर : दिल्ली येथे सातत्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असून तातडीने या सर्व मागण्यांबाबत मा. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषिमंत्री यांनी निर्णय घ्यावा आणि शेतकरी आंदोलकांच्या किमान आधारभूत किंमतीसह अन्य मागण्या मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करावी. अशी मागणी शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केली. या मागणीसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष यांच्यावतीने दिनांक 20 जानेवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सतत सुरू असून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील सर्व शेतमालाचे भाव पडले आहेत. केंद्र व राज्य सरकारांकडे किमान आधारभूत किंमतीने ( एमएसपीने ) संपूर्ण शेतमाल खरेदी करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नवी पिढी शेतीतून बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना काळात केवळ शेतीनेच शेती क्षेत्राचा जीडीपी ( सकल राष्ट्रीय उत्पन्न ) कायम ठेवून शेतकऱ्यांनी देश वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तरीही केंद्र सरकार शेतक-यांच्या मागण्यांबाबत उदासीन आहे, किंबहूना शेतक-यांच्या मागण्यांना दुय्यम स्थान देत आहे
केंद्र सरकारच्या या अडेलतट्टू धोरणाचा निषेध करण्यासाठी व केंद्राने तात्काळ दिल्ली येथील शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी व तेथील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनास पाठिंबा देत शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, शे.सं. जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, प्रा. सतीश मोहितकर, सुधीर सातपुते, ॲड.दीपक चटप, शेषराव बोंडे, रमेश नळे, रामकृष्ण सांगळे, प्रसाद राव, मिलिंद गड्डमवार, मारोतराव बोथले, प्रसाद राव, मनोज कोपावार, पद्माकर मोहितकर, विकास दिवे, सुभाष रामगीरवार, सचिन बोंडे यांचेसह जिल्हा पदाधिका-यांनी धरणे आंदोलन केले.