

चंद्रपूर : सत्ताधारी सरकारने निवडणुकीत विविध आश्वासने दिली, त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मुद्दा होता. परंतु अद्याप त्यावर सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील वरोरा येथे रत्नमाला चौकात शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.१०) दुपारी १ वाजता चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज जोडणी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी यावेळी आंदोलकांनी केल्या.आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने संतप्त शेतकरी नेते विजय डुकरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
आंदोलनादरम्यान डुकरे यांनी १ मार्च २०२१ नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी द्यावी, सत्ताधारी सरकारने निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, मागील वर्षीचा कपाशी वरील पिक विमा व चालू वर्षातील खरीप हंगामातील पिक विमा शेतकऱ्यांना तत्काळ द्यावा, नाफेडची सोयाबीन खरेदी मुदत वाढविण्यात यावी, भावामधील तफावत म्हणून शेतकरी यांना प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस देण्यात यावे, सन २०२४-२५ मधील पूर्ण हंगाम होईपर्यंत सीसीआय ची कापूस खरेदी सुरु ठेवण्यात यावी, गरजू शेतकऱ्यांना तात्काळ नवीन वीज जोडणीसाठी डिमांड देण्यात यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलन सुरू होऊन अवघे दहा मिनिट झाले असताना चंद्रपूर नागपूर या महामार्गावरून वाहतूक विस्ककळीत झाली होती. त्यामुळे वाहतुकीत खोळंबा निर्माण होईल, जनतेला त्रास होऊ शकतो. तसेच कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते हे कारण दाखवून आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलन वेळीतच संपुष्ठात आले.
शेतकऱ्याच्या मागण्या शासन व प्रशासनाकडे धुळखात पडून आहेत. सरकारच्या वेळकाढू व दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या एकाही समस्यांचे निराकरण होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. शासन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या समस्यांची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू, अशा इशारा शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी दिला.