

चंद्रपूर : खरीप हंगाम २०२५ च्या धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस द्यावा, बोनसची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागभीड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी (१७ सप्टेंबर) नागभीड तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. तळोधी-बाळापूरपासून सुरू झालेला हा मोर्चा नागभीडमध्ये दाखल होताच परिसर शेतकऱ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. तब्बल ३०० हून अधिक ट्रॅक्टर आणि मोठ्या संख्येने दुचाकी वाहनांचा ताफा मोर्चात सहभागी झाला होता. विशेष म्हणजे मोर्चादरम्यान जोरदार पाऊस कोसळला. मात्र, पावसानेही शेतकऱ्यांचा निर्धार डगमगला नाही. अनेक शेतकरी पावसात अक्षरशः चिंब भिजले, तरीही त्यांनी आंदोलनस्थळ सोडले नाही.
‘धान बोनस आमचा हक्क’च्या घोषणांनी नागभीड दुमदुमले
तळोधी-बाळापूर येथील साई मंदिर देवस्थान परिसरातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. गावागावांतून शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक, ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा आणि ‘धान बोनस आमचा हक्क’सह विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागभीडकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांचा मोठा जनसागर पाहायला मिळाला.
मोर्चात महिला शेतकऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी एकजुटीने आपल्या मागण्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविला. मोर्चाचे नेतृत्व कोण्या एका व्यक्तीचे नसून, हा शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी एकजुटीने उभारलेला आक्रोश मोर्चा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पावसाने झोडपले; शेतकरी मात्र ठाम
मोर्चा नागभीड तहसील कार्यालयाच्या परिसरात दाखल झाल्यानंतर काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी वाढत असतानाही शेतकरी आंदोलनस्थळी ठाम राहिले. अनेक शेतकरी पावसात ओलेचिंब झाले; मात्र धान बोनस आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेला आवाज थांबला नाही. पावसाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी घोषणा देत आपली मागणी लावून धरली. त्यामुळे या मोर्चातून शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्यांची एकजूट प्रकर्षाने दिसून आली.
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदार महेश देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार देशमुख हे भरपावसात मंचावर आले. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने ते अक्षरशः ओलेचिंब झाले होते. मात्र, पावसाची पर्वा न करता त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेक्टरी २० हजार बोनसची प्रमुख मागणी
खरीप हंगाम २०२५ मध्ये उत्पादित धानासाठी हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्यात यावा, बोनसची रक्कम विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसेच शेतीशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि सिंचनाच्या वाढत्या खर्चामुळे शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यातच शेतीमालाच्या दरातील अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटांमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे धान बोनसची रक्कम तातडीने मिळणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
विविध पदाधिकारी, शेतकऱ्यांची उपस्थिती
मोर्चाच्या मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस कोल्हे, लक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मा कांबळी, विनोद नवघडे, गिरीश नवघडे, प्रफुल्ल खापरडे, सुनीता डोईजड, नगरसेवक नयना गेडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता खापर्डे, नगराध्यक्ष नागभीड कृष्णा गंदेवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय तुकाराम निकुरे, रमेशजी बोरकर, धनंजय बोरकर, विनोद बोरकर, संजय गहाणे, कृष्णा गंजेवार, गिरीश नवघाडे, दिवाकर कामडी, अतुल सिद्धमाशेट्टीवार, अतिश भाकरे, भूपेश भाकरे, विलास घोनमोडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन
मोर्चादरम्यान ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा, दुचाकी वाहनांचा ताफा, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि जोरदार पावसातही कायम राहिलेला शेतकऱ्यांचा उत्साह यामुळे नागभीड तहसील परिसरात शेतकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडले. विशेष म्हणजे पाऊस सुरू असतानाही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे मोर्चाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आता शासनाने धान बोनससह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. भरपावसात हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे धान बोनसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासनाच्या पुढील निर्णयाकडे नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.