

Kanhalgaon Tiger Attack Cattle farmer bravery
चंद्रपूर: अवकाळी पावसाने उसंत घेतल्यानंतर जनावरे चारायला घेऊन गेलेल्या एका 68 वर्षीय शेतकऱ्याने वाघांच्या हल्ल्यातून आपल्या दोन जनावरांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. झुडपात दबा धरून बसलेल्या दोन वाघांनी जनावरांवर हल्ला केल्यानंतर शेतकऱ्याने काठीने वाघ व बछाड्याला पिटाळून लावले. ही घटना नागभीड तालुक्यातील कन्हाळगावाजवळ घडली असून, या वृद्ध शेतकऱ्याच्या धाडसाची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.
नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील 68 वर्षीय शेतकरी तुळशीराम काळसर्पे यांनी गुरुवारी (दि.३०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास आपली काही जनावरे घेऊन गावापासून 1 किमी अंतरावर चारायला नेली. काल रात्रीपासून सकाळीपर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सकाळी जनावरे चारायला नेता आली नव्हती. त्यामुळे दुपारी हवामान थोडे खुलल्यावर ते गाई-गोरे घेऊन गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नहर सावरगाव मार्गावरील परिसरात घेऊन गेले.
जनावरे शांतपणे चरत असताना लगतच्या झुडपात दोन वाघ – एक मोठा आणि एक बछडा – दबा धरून बसलेले होते. अचानक मोठ्या वाघाने एका गायीवर झडप घातली, तर बछड्याने दुसऱ्या गोऱ्याला पकडले. ही संपूर्ण घटना तुळशीराम यांच्या लक्षात आली आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जनावरांना वाचवण्यासाठी धाव घेतली.
हातात असलेल्या काठीच्या आधारावर त्यांनी वाघाच्या दिशेने जाण्याचा धाडस केला. प्रचंड आरडा ओरड करून गाईवर हल्ला करणाऱ्या वाघालगत झुडपावर काठीने जोरदार फटके मारले. शेतकऱ्यांनी केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे वाघ गोंधळला आणि मागे हटला. त्याचवेळी शेतकरी गोऱ्यावर हल्ला करणाऱ्या बछड्याच्या दिशेने वळला. बछड्यालालाही पिटाळून लावले. काही क्षणांसाठी वाघ, बछडा आणि शेतकऱ्यामध्ये चांगलाच थरारक घडला. परंतु 68 वर्षीय तुळशीराम यांच्या धैर्यासमोर वाघ बछडा मागे सरकले आणि झुडपातून जंगलात पळ काढला.
घटना घडल्याची माहिती तुळशीराम यांनी एका मोटर सायकल चालकाच्या वतीने गावात दिली. काही नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले. जखमी झालेल्या जनावरांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावात आणण्यात आले. दोन्ही जनावरे किरकोळ जखमी झाली असली तरी त्यांचे प्राण वाचले. गावात आल्यानंतर तुळशीराम काळसर्पे यांच्या शौर्याची प्रशंसा सर्वत्र करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात सध्या वाघांची हालचाल वाढल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वाघांनी जनावरांची तसेच मानवांचीही शिकार केल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कन्हाळगाव परिसरातील घटनेने पुन्हा एकदा वनविभागासमोर सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न उभा केला आहे.
शेतकरी आपल्या जनावरांवरच उपजीविका अवलंबून असल्याने तेच त्यांचे ‘जीव की प्राण’ असतात. त्यांना वाचवण्यासाठी तुळशीराम काळसर्पे यांनी दाखवलेले धैर्य म्हणजे ग्रामीण शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तुळशीराम काळसर्पे यांच्या शौर्यकथांची चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यांना “धाडसी शेतकरी” म्हणून संबोधले आहे.