

चंद्रपूर : सध्या सोशल मिडियाच्या जगतात "ब्रेकिंग न्यूज" हा नवा ट्रेंड बनला आहे. प्रत्येकजण घडलेल्या घटनांची शहानिशा न करता माहिती शेअर करण्याच्या स्पर्धेत आहे. अश्यातच एक बनावट व्हीडिओ समाजात भीती आणि संभ्रम पसरवून जातो, आणि काही कुटुंबांची जीवघेणी फरपट सुरू होते.
असाच एक प्रकार रविवारी (दि. 22) चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डात घडला. एका महिलेला रात्री ९.३० वाजता संशयास्पद हालचाली करताना पाहिल्यानंतर लोकांनी तिला थेट “मुले चोरणाऱ्या टोळीतील सदस्य” ठरवले. काही वेळातच व्हिडिओ शूट करून सोशल मिडियावर प्रसारित केला गेला. यात दावा करण्यात आला की, तिच्यासोबत आणखी चार महिला असून त्या बालचोरीच्या टोळीतील आहेत.
व्हिडिओ प्रचंड वेगाने वायरल झाला आणि शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले – ती महिला मनोरुग्ण असून, तिचा या टोळीशी काहीही संबंध नाही. तिच्या नावाने जो गाजावाजा झाला, तो पूर्णपणे निराधार आणि खोटा होता.
पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली असता ती मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या कुटुंबीयांनीही तिच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय कागदपत्राद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे पोलीस तिला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, तिचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन बदलला. कुटुंबाला अनेक अपमानास्पद अनुभवांना सामोरे जावे लागले. यामुळे मानसिक धक्का बसलेले कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेले.
या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "त्या महिलेबाबतचा व्हिडिओ कुणीही शेअर करू नये, आणि तो तातडीने डिलीट करावा." पोलिसांनी सायबर सेलमार्फत व्हिडिओ हटविण्यासाठी विशेष खबरदारी घेतली असून, ज्या ज्या ठिकाणी तो आढळतो आहे, तेथून तो काढून टाकला जात आहे.
महिलेच्या कुटुंबीयांनी व्हिडिओमुळे समाजात होणारी बदनामी आणि मानसिक त्रास यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली. यावर तत्काळ प्रतिक्रिया देत सायबर सेलने व्हिडिओ हटविण्यास सुरुवात केली आणि नागरिकांना गैरसमज टाळण्यासाठी योग्य माहिती दिली.
या घटनेने एक बाब पुन्हा अधोरेखित केली आहे – सोशल मिडियावर शेअर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीचा, कुटुंबाचा किंवा समूहाचा आयुष्य एका 'फेक व्हिडिओ'ने उद्ध्वस्त होऊ शकतो. "वाटेल ते व्हायरल करू नका, आधी विचार करा – मगच शेअर करा=असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.