

चंद्रपूर : सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आणखी एका नागरिकाचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याहाड–सोनापूर मार्गावर दुचाकीसमोर अचानक आलेल्या हत्तीपासून जीव वाचवण्यासाठी धावलेल्या अतुल गोहने (वय ४५) रा . सोनापुर यांचा हत्तीने पाठलाग करून हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती पुन्हा एकदा खरी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल गोहने हे आणखी दोघांसह दुचाकीने स्वतःचे गावी सोनापूरच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, व्याहाड–सोनापूर मार्गावर अचानक त्यांच्या दुचाकीसमोर रानटी हत्ती आला. समोर अचानक हत्ती दिसल्याने तिघेही घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी वाहन रस्त्यावरच सोडून पळण्याचा प्रयत्न करू लागले.
पळापळीच्या गोंधळात दोघेजण जंगलाच्या दिशेने वेगवेगळ्या बाजूंनी निघून गेले, तर अतुल गोहने हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. मात्र, ते अधिक दूरपर्यंत जाऊ शकले नाहीत. संतप्त झालेल्या हत्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अन्य दोघांनी कसाबसा जीव वाचवत गाव गाठले आणि घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी अतुल गोहने यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी शोध घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला अतुल गोहने यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त वावर सुरू असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र आता हत्तींच्या वाढत्या हालचालींमुळे मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे.
या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचे इशारे देणे आणि संवेदनशील भागांमध्ये तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.