Chandrapur Drought : पावसाअभावी धानपीक करपले; कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याने तलावात घेतली उडी!

नागभीड तालुक्यातील मींथुर येथील घटना; मृतदेह सायंकाळी आढळला
Chandrapur Drought : पावसाअभावी धानपीक करपले; कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याने तलावात संपवले जीवन!
Chandrapur Drought : पावसाअभावी धानपीक करपले; कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याने तलावात संपवले जीवन!
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : पावसाअभावी धानपीक करपल्याने आणि डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतून नागभीड तालुक्यातील मींथुर येथील ६५ वर्षीय शेतकरी मुखरू लक्ष्मण दडमल यांनी गावातील तलावात उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना आज रविवारी (११ ऑक्टोबर) घडली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांनी तलावात उडी घेतल्याची माहिती असून, पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.

नागभीड तालुक्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर मींथुर हे गाव आहे. मुखरू दडमल यांच्याकडे एक ते सव्वा एकर शेती होती. यंदा पावसाअभावी त्यांच्या शेतातील संपूर्ण धानपीक करपल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

दडमल यांच्यावर मायक्रोफायनान्स कंपनीचे कर्ज असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. पीक हातचे गेल्याने कर्जाची परतफेड आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतावत होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. ठाणेदार कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला.मुखरू दडमल यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे मींथुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सरकारकडून कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष मदत किती आणि कधी मिळणार, असा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्यांसमोर आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे धानपीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news