

Chandrapur School Holiday
चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने (IMD) २९ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेसना बुधवारी (दि. २९) एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यात २९ जुलै रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यामुळे पूरस्थिती, नदी-नाल्यांना आलेला पूर, रस्ते जलमय होणे आणि इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेस २९ जुलै रोजी पूर्णपणे बंद राहतील. संबंधित शिक्षण संस्था आणि प्रशासनाला या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पूरग्रस्त किंवा पाण्याने भरलेल्या भागात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे ०७१७२-२५००७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि इतर संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.