Chandrapur Crime | एकाच नंबर प्लेटवर धावणारी दोन वाहने पकडली; ८१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त!

बनावट ई-टीपी व एकाच नोंदणी क्रमांकाचा वापर करून अवैध रेती वाहतूक, तीन जणांविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा
Chandrapur Crime | एकाच नंबर प्लेटवर धावणारी दोन वाहने पकडली; ८१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त!
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस आणि भद्रावती पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकाच नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट आणि एकाच ई-टीपीच्या आधारे रेतीची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन जड वाहने, २२ ब्रास रेती असा एकूण ८१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन जणांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानीक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्त धाड मोहीम राबवत अवैध रेती वाहतुकीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला. शासनाचा महसूल बुडवण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक (MH-34-BZ-8114) आणि एकाच ई-टीपी क्रमांकाचा (33198347) वापर करून रेतीची वाहतूक सुरू असल्याचे तपासात उघड झाले

Chandrapur Crime | एकाच नंबर प्लेटवर धावणारी दोन वाहने पकडली; ८१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त!
Chandrapur Crime | गडचांदूर पोलिसांची मोठी कारवाई; 35 गोवंशीय जनावरे तस्करांच्या तावडीतून मुक्त

७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर रामनगर पोलिसांना मूल-चंद्रपूर मार्गावर दोन संशयित वाहने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली नागपूर मार्गावरील वाहतूक शाखेजवळ नाकाबंदी करण्यात आली. रात्री सुमारे ३ वाजता संशयित १२ चाकी हायवा पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने वाहन भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळविले. पोलिसांनी पाठलाग करून भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ परिसरात वाहन ताब्यात घेतले.

यानंतर सुमारे ३.३० वाजता दुसरे १६ चाकी वाहनही नाकाबंदीत अडविण्यात आले. तपासणीदरम्यान दोन्ही स्वतंत्र वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक असल्याचे आणि दोन्ही चालकांकडे एकाच ई-टीपीचा वापर करून रेती वाहतुकीचे कागदपत्र असल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत १६ चाकी टाटा ४८३० टी.के. ट्रक (अंदाजे किंमत ४५ लाख रुपये) व त्यातील ११ ब्रास रेती, तसेच १२ चाकी टाटा ३५३२ टी.के. हायवा (अंदाजे किंमत ३५ लाख रुपये) व त्यातील ११ ब्रास रेती असा एकूण ८१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात स्वप्निल सुरेश कबडे (वय ३७) रा. सावजी नगर, वर्धा, रामकेश राजेश केवट (वय २०) तर रा. सीधी, मध्य प्रदेश) आणि वाहनमालक रोहन चाफले (रा. खांबाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात संयुक्त पथकाने केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news