Chandrapur Crime : पानवडाळा परिसरात शेतकऱ्यांच्या शेतांवर चोरट्यांचा धुमाकूळ; ६ शेतकऱ्यांचे १.४५ लाखांचे साहित्य लंपास

एका रात्रीत लोखंडी गेट, स्प्रिंकलर, स्प्रे पंप, बैलगाडीची चाके, पेरणी साहित्य चोरी : अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा
 Crime
Crime(File Photo)
Published on
Updated on

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पानवडाळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत सहा शेतकऱ्यांच्या शेतांवर धाड टाकत तब्बल १ लाख ४४ हजार ६०० रुपयांचे शेती साहित्य व अवजारे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पानवडाळा परिसरातील शेतकरी सूर्यभान माणिकराम रताने यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी शेतातील सर्व साहित्य सुरक्षित ठेवून घरी परतले होते. मात्र, १२ जुलै रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर लोखंडी गेट, बैलगाडीची लोखंडी चाके आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेची माहिती घेत असताना परिसरातील अनिल चिकटे, अतिश भोयर, निलेश डोहे, प्रमोद काळे आणि दादाजी देठे यांच्या शेतांमधूनही विविध शेती अवजारे चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे एका रात्रीत सहा शेतकऱ्यांच्या शेतांवर चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हात साफ केल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी लोखंडी गेट, बैलगाडीची लोखंडी चाके, स्प्रे पंप, झाडे कापण्याचे मशीन, १४ स्प्रिंकलर, लोखंडी डबे, पेरणीसाठी लागणारे साहित्य, लोखंडी फण, जुनी सायकल तसेच डंबेल्ससारखे साहित्यही लंपास केले. या चोरीमुळे सहाही शेतकऱ्यांचे मिळून १ लाख ४४ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष किसन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, एका रात्रीत सलग सहा शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चोरी झाल्याने पानवडाळा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news