

चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी महाकाली कॉलरी, आनंदनगर परिसरात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या महिलांविरुद्ध मोठी कारवाई करत एकूण आठ महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १,४१,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शोध पथकाने केली. आज मंगळवारी ( ०५ ऑगस्ट) रोजी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून आनंदनगर परिसरातील काही घरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोहा सडवा, मोहा दारू व देशी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. छाप्यात लक्ष्मी अशोक दहागावकर (वय ४६), कांता प्रकाश चापडे (वय ५६), छाया शंकर दुर्गे (वय ५०), तुळशी दिपक मेश्राम (वय ३७), शशीकला त्रिमोहन बुटले (वय ४१), माया लक्ष्मण दुर्गे (वय ५८), मोनिका विजय दुर्गे (वय ३६), व सुशिला मुरलीधर ठाकरे (वय ६०) या आठ महिलांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी मोहा दारू – ४८५ लिटर, किंमत ३३,९५०, मोहा सडवा – १२८० लिटर, किंमत ६४,०००, दारू तयार करण्याचे साहित्य ४२,१५०, देशी दारूच्या ३४ प्लास्टिक बाटल्या – १३६० एकूण किंमत १,४१,४६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईनंतर संबंधित महिलांविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या या धडक कारवाईने परिसरातील अवैध दारू व्यवसायांना मोठा धक्का बसला आहे.