

चंद्रपूर : विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याचे भासवण्यात आलेल्या एका प्रकरणाचा तब्बल दीड वर्षानंतर उलगडा झाला आहे. शवविच्छेदनाच्या अंतिम वैद्यकीय अहवालासह पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून हा स्वतःहून जीवन संपवण्याचा प्रकार नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात मृत व्यक्तीच्या मुलानेच वडिलांचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.
राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार्ली शेतशिवारात २० मे २०२५ रोजी रात्री १ ते १:३० च्या सुमारास शंकर परशुराम काळे (वय ६०) यांच्याबाबत ही घटना घडली होती. सुरुवातीला याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४४/२०२५ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार मर्ग दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला.
दरम्यान, मयताच्या शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालावरून मृत्यू स्वतःहून जीवन संपवल्यामुळे नव्हे, तर गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृताच्या मुलाने वडिलांनी विष प्राशन करून जीवन संपवल्याची खोटी माहिती देऊन घटनास्थळी बनाव रचत पोलिसांची दिशाभूल केल्याचेही तपासात समोर आले.
या मर्ग चौकशीदरम्यान मृताचा मुलगा निखिल शंकर काळे (वय ३१, रा. धिडशी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) याच्याकडे पोलिसांनी पुन्हा सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनाचा अंतिम वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या फिर्यादीवरून २९ ऑक्टोबर २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) व २४० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि साहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या पथकाने केली.