

चंद्रपूर : मांढेळी येथील मोबाईल शॉपीमध्ये झालेल्या धाडसी चोरी प्रकरणाचा वरोरा पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. रात्रीच्या सुमारास शटर तोडून चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करत चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या कार्यक्षम तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी मांढेळी येथील रहिवासी श्री. शंकर नागोराव क्षिरसार यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या लारा मोबाईल शॉप या दुकानाचे शटर अज्ञात आरोपींनी रात्रीच्या वेळी तोडून दुकानातून दोन लॅपटॉप (किंमत अंदाजे ३०,००० रुपये) तसेच नगदी ८०,००० रुपये असा एकूण १,२०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली होती.
या तक्रारीवरून वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. ०६/२०२६ अन्वये कलम ३३१ (४), ३०५ बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांच्या तपास पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा शहरातील सुमारे १०० हून अधिक दुकाने व घरांतील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले. बारकाईने केलेल्या तपासातून वरोरा येथे राहणारा हर्षद राहुल पेटकर व त्याच्या साथीदारांचा सहभाग उघडकीस आला.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी हर्षद राहुल पेटकर यास अटक केली असून त्याच्याकडून चोरी गेलेले दोन लॅपटॉप (कि.अ. ३०,००० रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (कि.अ. ५०,००० रुपये) असा एकूण ८०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा मा. संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि शरद एस. भस्मे, पोहवा दिलीप सुर, पोहवा संदीप मुळे, पो.अं. महेश गावतुरे व पोअं. सौरभ कुलथे यांनी ही यशस्वी कारवाई केली.