Chandrapur Racket | ‘द्या पैसा, घ्या डिग्री!’ : चंद्रपुरात बनावट मार्कशीट- पदवी रॅकेटचा पर्दाफाश!

विविध विद्यापीठांच्या बनावट गुणपत्रिका व पदव्या तयार करून देणारे रॅकेट उघडकीस; एक आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार
Chandrapur Racket | ‘द्या पैसा, घ्या डिग्री!’ : चंद्रपुरात बनावट मार्कशीट- पदवी रॅकेटचा पर्दाफाश!
Chandrapur Racket | ‘द्या पैसा, घ्या डिग्री!’ : चंद्रपुरात बनावट मार्कशीट- पदवी रॅकेटचा पर्दाफाश!
Published on
Updated on

चंद्रपूर : “कोणत्या विद्यापीठाची गुणपत्रिका हवी? कोणती पदवी हवी? पैसा द्या आणि डिग्री-मार्कशीट घ्या...” अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासणाऱ्या बनावट गुणपत्रिका व पदवी रॅकेटचा चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात वैभव सोनूले याला पोलिसांनी अटक केली असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार आहे. मुख्य सूत्रधार मूळचा चंद्रपूरचा असून सध्या राज्यातील विविध भागांत वास्तव्य करत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट गुणपत्रिका आणि पदव्या तयार करून देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट कागदपत्रांसाठी तब्बल ५ ते १० लाख रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आधीच नोकरीत असलेले आणि पदोन्नतीसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेले काही कर्मचारी या रॅकेटच्या माध्यमातून बनावट पदव्या मिळवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दोन आलिशान वाहने जप्त

दुर्गापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून दोन आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहेत. बनावट पदवी आणि गुणपत्रिकांच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, ग्राहकांची संख्या तसेच बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

राज्यभर रॅकेटचे जाळे?

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असल्याने या रॅकेटची व्याप्ती नेमकी किती आहे, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मुख्य सूत्रधार चंद्रपूरचा असून सध्या राज्यातील विविध भागांत वास्तव्य करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यामुळे हे रॅकेट केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित आहे की त्याचे जाळे महाराष्ट्रातील इतर शहरांसह देशातील विविध भागांपर्यंत पसरले आहे, याचा तपास केला जात आहे.

कोणत्या विद्यापीठाची पदवी? मागाल ती तयार!

या रॅकेटमध्ये संबंधित व्यक्तीच्या मागणीनुसार विविध विद्यापीठांच्या नावाने पदवी आणि गुणपत्रिका तयार करून देण्यात येत असल्याचा संशय आहे. कोणत्या अभ्यासक्रमाची पदवी हवी, कोणत्या विद्यापीठाची मार्कशीट हवी, किती गुण दाखवायचे, यानुसार बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे.

नोकरीतील कर्मचाऱ्यांवरही संशय

पदोन्नती किंवा नोकरीतील शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी काही कर्मचारी या रॅकेटच्या माध्यमातून बनावट पदव्या घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या बनावट पदव्यांच्या आधारे कोणी नोकरी मिळवली किंवा पदोन्नती मिळवली का, याचाही तपास पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे. असे प्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Chandrapur Racket | ‘द्या पैसा, घ्या डिग्री!’ : चंद्रपुरात बनावट मार्कशीट- पदवी रॅकेटचा पर्दाफाश!
Chandrapur News | अंगणवाडीच्या शेजारी बार नको; टेमुर्ड्यात महिलांचा प्रशासनाला इशारा

तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

सध्या पोलिसांचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी तसेच फरार मुख्य सूत्रधाराचा शोध घेतल्यानंतर या रॅकेटची संपूर्ण कार्यपद्धती, बनावट पदवी तयार करण्याची यंत्रणा, त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आणि ग्राहकांची संख्या याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरी आणि पदोन्नती मिळविणाऱ्या यंत्रणेलाच आव्हान देणारा हा प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बनावट पदव्या आणि गुणपत्रिकांच्या आधारे पात्र उमेदवारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर आहेत, हे पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news