

चंद्रपूर : दुबई येथे इंटरनॅशनल स्टेडियमवर पार पडलेल्या भारत न्युझीलँड मधील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात चंद्रपूरात सट्टा लावणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई 9 मार्चला कस्तुरबा रोडवरील हॉटेल व्यंकटेश येथे छापा टाकून कारवाई केली. आतापर्यत बेटिंगकरिता वापरात येणारे बँक खात्यातील सुमारे ६० लक्ष रुपयापर्यंतची रक्कम गोठविण्यात आली. या घटनेने चंद्रपूरात खळबळ उडाली आहे. पारस दादाराव उखाडे, अविनाश नारायण हांडे, राकेश अरुण कोंडावार सर्व रा. चंद्रपुर असे आरोपींचे नाव आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन शहर पोलिस स्टेशन हद्दीतील कस्तुरबा रोडवरील हॉटेल व्यंकटेश (फ्रेन्ड बॉर अॅण्ड रेस्टॉरंट, नायडु चेंबर) या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी पारस दादाराव उखाडे, अविनाश नारायण हांडे, राकेश अरुण कोंडावार सर्व रा. चंद्रपुर हे हॉटेलच्या एका रुम मध्ये भारत-न्युझीलँड क्रिकेट सामन्यावर alipanelexch.com, nice7777.fun a nice.45-tech या ऑनलाईन बेटींग आयडी पुरवणा-या साईटवर बेटींग करत असताना आढळून आले.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन मोबाईल 5 नग किंमत १ लाख २५ हजार रूपये, रोख रक्कम २६ हजार ७०० रूपये, टीव्ही व इतर साहित्य किंमत २५ हजार असा एकुण १ लाख ७६ हजार ७०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक तपासात अटकेत असलेल्या आरोपींनी यापुर्वी सुध्दा ऑनलाईन क्रिकेट बेटींग केले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते ऑनलाईन क्रिकेट बेंटीग करिता वेगवेगळ्या लोकांना आय डी पासवर्ड देत असुन बेटींगच्या पैश्याची देवाण घेवाण करतात. त्यांनी आतापर्यंत ३८ वेगवेगळे बँकेचे खाते वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी काही खाते हे परराज्यातील असून हे सर्व खाते पोलीसांनी तपासादरम्यान फ्रिज केले आहे. त्यामधील सुमारे ६० लाखाची रक्कम गोठविण्यात आली आहे. काही आंतरराष्ट्रीय क्रमांकावर सुध्दा आरोपींचे ऑनलाईन क्रिकेट बेटीग संबधी चॅटींग आढळून आले आहे. त्यामध्ये सुध्दा लाखो रुपयाचा व्यवहार केल्याची माहिती चॅटींगमध्ये आढळून आली आहे.
सायबर पोलीसांच्या मदतीने आरोपींच्या मोबाईल तपासणी सुरु असुन चंद्रपुर, नागपुर, यवतमाळ, गडचिरोली व अन्य शहरातील व्यक्ती हे या आरोपींकडे ऑनलाईन बेटींग करित असल्याचे तपासात उघड झाले आहे. allpanelexch.com, nice7777.fun a nice. 45-tech या ऑनलाईन बेटींग साइट बनवणारे व आरोपी व्यक्तींना पुरविणा-या व्यक्तीबाबत पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा गणेश मोहुर्ले, पोना संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, अमोल सावे, मिलींद जांभुळे यांनी केली आहे.