Congress setback in Chandrapur | चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का ? ; वारजुकर बंधूं भाजपमध्ये प्रवेश करणार

प्रांताध्यक्षांकडे सोपविला राजीनामा, मुंबईत पक्ष कार्यालयात होणार औपचारिक प्रवेश
Congress setback in Chandrapur
Congress setback in Chandrapur
Published on
Updated on

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिमूरचे माजी आमदार अविनाश वारजुकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर या सख्ख्या भावांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अंतर्गत नाराजीचा शेवट राजीनाम्यात

चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे वारजुकर बंधू मागील काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर अविनाश वारजुकर आणि सतीश वारजुकर यांनी आपल्या नाराजीला मूर्त रूप देत प्रांताध्यक्षांकडे काँग्रेसचा राजीनामा सादर केला. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये चिमूर मतदारसंघातून सतीश वारजुकर यांना पराभव पत्करावा लागला होता. पक्षातील काही नेत्यांच्या असहकारामुळेच हा पराभव झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांत होती. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरील राजकारणात मोठे बंधू अविनाश वारजुकर यांना योग्य स्थान मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली जात होती.

मुख्यमंत्र्यांची भेट, प्रवेशाची तयारी

राजीनाम्यापूर्वी वारजुकर बंधूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय पक्का करण्यात आला. मुंबईत आज भाजपच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. विशेषतः चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिमूर ब्रह्मपुरीत काँग्रेससमोर आव्हान

वारजुकर बंधू हे चिमूर तालुक्यात काँग्रेसचे मजबूत चेहरे मानले जात होते. त्यांचा स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि कार्यकर्त्यांवरची पकड लक्षात घेता त्यांच्या निर्णयाचा परिणाम येत्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होऊ शकतो. काँग्रेसमध्ये आधीच गटबाजीचे वातावरण असल्याची चर्चा सुरू असताना हा राजीनामा पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील संघटन मजबूत ठेवण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे राहणार आहे.

चिमूर ब्रह्मपुरीत भाजपसाठी बळकटी

भाजपने गेल्या काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात आपले संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. वारजुकर बंधूंच्या प्रवेशामुळे भाजपला चिमूर आणि ब्रह्मपुरी भागात राजकीय बळकटी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले नेतृत्व पक्षात आल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

राजकीय परिणामांची चर्चा

वारजुकर बंधूंच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसमधील इतर नाराज नेत्यांवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही नेते पक्षांतर करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. वारजुकर बंधूंच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे असून, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news