

चंद्रपूर : चिमूर तालुक्यात गुरुवारी (दि.७) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वीज पडून दोन गंभीर घटना घडल्या. पिंपळनेरी शिवारात गुरे चारत असलेल्या तरुण शेतकऱ्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला तर चिमूर शहरालगत असलेल्या तनिस कॉलनी परिसरात वीज पडून पाच म्हशी दगावल्या.
चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील रहिवासी गणेश भाऊराव धानोरकर (वय ३३) हा तरुण शेतकरी आज गुरुवारी दुपारी आपल्या मौजा पिंपळनेरी येथील शेतशिवारात गुरे चारत होता. यादरम्यान दुपारी १.३० च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी गणेशच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला.गणेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
चिमूर शहराला लागून असलेल्या तनिस कॉलनी परिसरात गुरुवारी दुपारी आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. या परिसरात परसराम कामडी यांच्या दोन म्हशी, सुरेश कामडी यांच्या दोन म्हशी, तर संभाजी खाटीक यांची एक म्हैस अशा पाच म्हशी या ठिकाणी चरत होत्या. यादरम्यान वीज पडून पाच म्हशींची जागीच मृत्यू झाला.