

चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या ३ वर्षांच्या बालकाचा चंद्रपूर पोलिसांनी अवघ्या २० तासांत शोध घेत त्याला पालकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील ५ महिला आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोन पुरुष आरोपींचा शोध सुरू आहे. सजग नागरिकांच्या सतर्कतेसह शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
रेल्वे स्टेशन परिसरातून मध्यरात्री अपहरण
२८ फेब्रुवारीला २७ वर्षीय महिलेने येथे तक्रार नोंदवली. तक्रारदार महिला व तिचे पती हे बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असून कचरा गोळा करून उदरनिर्वाह करतात. २७ फेब्रुवारीच्या रात्री कुटुंबीयांसह स्टेशनसमोरील खुल्या पटांगणात झोपले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
७ पथके, १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलीस ठाण्याची एकूण ७ स्वतंत्र पथके गठीत करण्यात आली. तपासादरम्यान १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक पुरावे आणि एका स्थानिक सजग नागरिकाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासातून आरोपींनी बालकाचे अपहरण करून चारचाकी वाहनातून तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे नेल्याचे स्पष्ट झाले.
साडेतीन लाखांत बालकाची विक्री
तपासात उघडकीस आले की, आरोपी महिला ऐलक्का रायसिंग बुद्दे (वय ६०), राणी विनोदकुमार पसनोटी (वय ३०) आणि संगिता व्यंकटेश पानंगणती (वय ४०) या तिघी दोन पुरुष साथीदारांसह बल्लारपूर येथे आल्या होत्या. त्यांनी काही काळ बालकावर पाळत ठेवली आणि आई-वडील झोपेत असताना त्याचे अपहरण केले.त्यानंतर आरोपींनी अपहृत बालकाची मंथनी (जि. मंचेरियल) येथील सातक्का चंद्रया करेरे (वय ५०) व लावण्या कुमारस्वामी कोणा (वय ३४) यांना तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांत विक्री केली. पोलिसांनी मंचेरियल येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाचही महिला आरोपींना अटक केली आहे. फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.
२० तासांत बालकाची सुटका
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित अवघ्या २० तासांत बालकाची सुखरूप सुटका केली. अपहृत बालकास ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंतरराज्यीय टोळीचा संशय
प्राथमिक तपासात ही टोळी बालकांची चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी इतर ठिकाणी केले आहेत का? याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे बाल तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक गौरव कायंदे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली. तसेच तेलंगणा राज्यातील मंचेरियल पोलीस दलानेही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मोलाची मदत केली
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
चंद्रपूर पोलीसांतर्फे राबविण्यात येत असलेले हे हरविलेले व पळविलेले बालक शोधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या अंतर्गत नागरिकांनी सतर्क राहून परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही माहिती असल्यास डायल ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे.