

चंद्रपूर : छठ पूजनानंतर वर्धा नदी घाटावर आज मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. पूजन आटोपल्यानंतर श्रद्धाळूंनी भरलेली एक लाकडी नाव अचानक उलटली, मात्र स्थानिकांच्या तत्परतेने दहा जणांचा जीव वाचवण्यात यश आले. दोन लहान मुले बेशुद्ध अवस्थेत सापडली होती, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना धोका टळल्याचे सांगितले आहे.
आज मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास बल्लारपूर-राजुरा मार्गावरील वर्धा नदी घाटावर छठ महापर्वाच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी पाण्यात उभे छठ पुजा केली. पूजा संपल्यावर काही श्रद्धाळूंनी नाव द्वारे नौकाविहारास सुरुवात केली. त्याचवेळी संतुलन बिघडल्याने नाव डळमळली आणि पाण्यात उलटली. नावेमध्ये सुमारे १० जण बसले होते, हे सर्वजण बल्लारपूरच्या दीनदयाळ वॉर्ड व राजुराच्या चुनाला येथील यादव कुटुंबातील सदस्य असल्याचे समजते. पाण्याची खोली जास्त नसल्याने मोठे लोक पोहत बाहेर आले, मात्र दोन लहान मुले पाण्यात अडकली. तेव्हा तेथील काही तरुणांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, या ठिकाणी मोठी गर्दी असूनही प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा बचावयंत्रणा दिसून आली नाही. ना नौकानियमनावर नियंत्रण, ना गोताखोर, ना प्राथमिक उपचाराची सोय. घाट परिसरात गर्दी वाढताच पोलिसांनी येऊन रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली, मात्र नदीकाठी प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी नव्हता. या घटनेची पोलिसांकडे अधिकृत नोंदही झालेली नाही. राजुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुमित परतेकी यांनी सांगितले की, “आम्हालाही ही घटना उशिरा समजली. सुदैवाने कोणीही जखमी किंवा मृत नाही, सर्वजण सुरक्षित आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्थानिक तरुणांच्या धैर्याने मोठी घटना टळल्याचे दिसत आहे.