

चंद्रपूर : गणेश विसर्जनाच्या दिवशीच चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत २९८ ग्रॅम ब्राऊनशुगरसह दोन आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करत एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौक येथे सापळा रचला. चंद्रपूरकडे येणारी संशयित कार थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनातील नितीन उर्फ छोटु शंकर गोवर्धन (वय ४२ , रा. महात्मा फुले वार्ड, बाबुपेठ, चंद्रपूर) याच्या ताब्यातून २९८ ग्रॅम ब्राऊनशुगर जप्त करण्यात आली. साथीदार साहिल सतिश लांबदुरवार (वय २३, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर) यालाही ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत सपोनि श्री योगेश हिवसे, दिपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार यांसह अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सायबर पोलीस स्टेशनच्या टीमनेही या कारवाईत सहाय्य केले.