Chandrapur Bribe | दुय्यम निबंधक ४ हजारांच्या लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

दस्तऐवज नोंदणीसाठी मागितली लाच; ऑपरेटरमार्फत रक्कम स्वीकारताना कारवाई
Bribe
Bribe
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला असून मालमत्ता दस्तऐवज नोंदणी करून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दुय्यम निबंधक श्रेणी-१ मोहन चंद्रकांत शेटट्टीवार आणि त्यांच्या ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून कारवाई केली. दस्तऐवज नोंदणीच्या मोबदल्यात मागितलेली लाचेची रक्कम ऑपरेटरमार्फत स्वीकारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भद्रावती तालुक्यातील मालमत्तेच्या नोंदणीसाठी तक्रारदाराने दुय्यम निबंधक कार्यालय, चंद्रपूर येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. संबंधित दस्तऐवजाची नोंदणी करून देण्यासाठी दुय्यम निबंधक मोहन चंद्रकांत शेटट्टीवार यांनी प्रत्येक नोंदणीमागे २ हजार रुपये याप्रमाणे दोन दस्तऐवजांसाठी एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

आरोपी दुय्यम निबंधक यांनी दस्तऐवज नोंदणीच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची लाच मागून ती त्यांच्या ऑपरेटरमार्फत स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news