

Ballarpur illegal firearm
चंद्रपूर : बल्लारपूर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत कारतुस जप्त केले. स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे नगर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी मो. ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख (वय 30) हा आपल्या घरी अवैधरित्या अग्नीशस्त्र ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सपोनि मदन दिवटे आणि सपोनि शब्बीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकासह आरोपीच्या घरावर धाड टाकण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिसांना जुन्या वापरातील लोखंडी धातूचे देशी बनावटीचे 7 एमएम बोरचे अग्नीशस्त्र व दोन पितळी जिवंत कारतुस आढळून आले.
दरम्यान, संबंधित साहित्य जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सपोनि शब्बीर पठाण करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, रणविजय ठाकुर, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने आणि गुरु शिंदे यांनी केली.