

Chandrapur News |
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील गवळी मोहल्ल्यात राहणाऱ्या अर्जुन गजर यांचा चार महिन्यांचा चिमुकला आयुष एका अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंज देतो आहे. स्पाइनल मस्क्युलर अॅतट्रोफी (SMA) हा आजार लाखांपैकी एखाद्या बाळालाच होतो आणि एकमेव उपाय म्हणजे झोल्गेसमा (Zolgensma) हे 16 कोटी रुपये किंमतीचं इंजेक्शन, जे फक्त एकदाच देण्यात येते. अत्यंत गरीब असलेला अर्जून गजर बाळाचा जीव वाचवण्यासाठी धडपडतोय. आयुषसाठी मदतीचा हात द्या अशी आर्त हाक अर्जून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधीना देत आहे.
डॉक्टरांनी अर्जून गजर यांनाही हाच उपचार सांगितला आहे. 4 महिन्याच्या आयुषच्या रडण्याचाही आवाज येत नाही, हात-पाय हलत नाहीत आणि दर दोन आठवड्यांनी त्याला न्यूमोनियाचा त्रास होतोय. ही लढाई वेळेशी आहे, कारण हे इंजेक्शन १६ महिन्यांपूर्वीच द्यावे लागते. बाळाला वाचविण्यासाठी अर्जूनला 16 कोटींचा खर्च करणे अशक्य आहे. 16 कोटींची रक्कम गोळा करण्याच्या विचाराने तो अस्वस्थ झाला आहे. अर्जुन मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतो. एवढ्या प्रचंड खर्चाचा भार त्याच्यासाठी अशक्य आहे. पण पित्याच्या नात्याने तो प्रत्येक दरवाजा ठोठावत आहे. आयूषचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाकडून थोड्याशा मदतीची आशा करतो आहे. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी, आणि सहृदय नागरिकांना त्यांनी निष्पाप जीवासाठी मदतीचा हात द्यावा म्हणून आर्त हाक दिली आहे. सरकारकडेही त्यांनी मदतीची मागणी केली आहे.
अर्जुन गजरची अत्यंत गरीब परिस्थीती आहे. मजुरीकरून तो कुटूंबाचा उर्दरनिर्वाह करतो. आयुषचा जन्म 26 जानेवारी 2025 रोजी चंद्रपुर सरकारी रुग्णालयात झाला. त्यानंतर त्याला घरी नेण्यात आले. 15 दिवसांनी आयुषने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे डॉ. मोहुर्ले यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. या काळात आयुषला वारंवार न्यूमोनियाचा त्रास होत होता. उपचार करूनही तो बरा होत नव्हता. दरम्यान, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषवर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार केले जातील, अशी माहिती दिली. दरम्यान, मुलाला नागपूरच्या एनएसएच क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचे रक्त तपासणीसाठी बंगळुरूला पाठवण्यात आले. अहवालात दुर्मिळ जिवघेणा स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA) हा आजार जडल्याचे समजले.