

चंद्रपूर : तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील आकापूर तलावात विविध प्रजातींचे पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मृत पक्षांना एकत्र करुन ताब्यात घेतले. वनविभागाने या पक्षांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे.
नागभीड तालुक्यातील आकापूर (उश्राळ रीठ) तलावलगत पाच-सहा दिवसांपासून दुर्मिळ प्रजातींचे काही पक्षी वृत्तावस्थेत पडून असल्याची माहिती आज शनिवारी अमोल भाकरे यांनी वनविभागाला दिली. ही माहिती मिळताच तळोधी (बा.) वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तलाव परिसरात दुर्मिळ उलन मानेचे करकोचा पक्षी, टिटोनी, टिटवी, काला शराटी, बगुला आदी जातींचे पक्षी मृतावस्थेत पडलेले होते. लगेच मृतावस्थेत पडलेल्या पक्षांना गोळा केले आणि या बाबतची माहिती वरिष्ठांना दिली.
मृतावस्थेत आढळून आल्याची पक्षांचे निरीक्षण केले असता काही पक्षांना जंगली जनावरांनी खावुन टाकले होते. एका ठिकाणी अनेक पक्षाचा पिसांचा आढळून आला. त्यामुळें पक्षांची शिकार करण्यात आली की काय? असा ही प्रश्न पडला आहे. उष्णतेमुळे किंवा अज्ञात रोगामुळे पक्षांचा मृत्यू झाला की काय? किंवा शिकाऱ्यांनी तलावांचे परिसरात काही विषारी औषध टाकुन मारले कि काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्रधिकारी अरुप कन्नमवार, वनरक्षक राजेंद्र भरने, यांनी घटनेचा पंचनामा करुन मृत्यू पक्षांना मातीत पुरले. यावेळी स्वाब संस्थेचे जीवेश सयाम, यश कायरकर, शुभम निकेशर, आदित्य नान्हे, चिराग सेलोकर, तथा वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
वाढत्या तापमानामुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन यामधे काही घातपाताने पक्षांना मारले असे काहिही निष्पन्न झाले झाले नाही. घटनेची चौकशी सुरू आहे.
अरुप कन्नमवार, वनपरिक्षेत्रधिकारी तळोधी बा.