

चंद्रपूर : सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील तिघे युवक कापसाच्या फवारणीचे औषध खरेदी करून दुचाकीने गावाकडे परत येत असताना आज सोमवारी भीषण अपघात झाला. गोंडपिपरी-खेडी मार्गावर पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
घटनेत सारंग गंडाटे (वय २६, रा. पेंढरी मक्ता) याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियांशु गंडाटे (वय २३, रा. पेंढरी मक्ता) याचा उपचारादरम्यान मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय लंकेश समर्थ (रा. मुंडाळा) हा गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.